Thursday, January 1, 2026

वाहतूक नियमांचे पालन सर्वांच्याच हिताचे - जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

🔸तरुण तडफदार न्यूज । प्रशांत बोरकर🔸
वाहतूक नियमांचे पालन सर्वांच्याच हिताचे
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

धुळे, दि. 1 जानेवारी, 2026 (जिमाका वृत्तसेवा) : वाहतूक नियमांचे पालन करणे सर्वांच्याच हिताचे असून प्रत्येक वाहनधारकाने नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह-2026 चे उद्घाटन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियता अनिल पवार, महानगरपालिका उपायुक्त करुणा डहाळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण देणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियम समजून घेत स्वतःमध्ये शिस्त लावून घेतली पाहिजे. नागरिकांसह सर्व संबंधित यंत्रणांनी वाहतूक नियमांचे पालन करून त्याबाबत व्यापक जनजागृती करावी. अपघात झाल्यास नागरिकांनी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करावी. वाहनांची वर्दळ अधिक असलेल्या ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमांची जनजागृती करावी. विद्यार्थ्यांच्या मनात वाहतूक नियमांचे महत्त्व रुजवणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील रस्ते अपघात विरहीत राहतील यांची दक्षता सर्व यंत्रणेने घ्यावी. प्रत्येकाने सतर्क, जागरूक राहत वाहतुकीच्या नियमांचे पालन केले केले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख म्हणाले की, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची आहे. नागरिकांनी एकमेकांचा सन्मान व सहकार्य केल्यास वाहतुकीला आपोआप शिस्त लागेल. वाहतूक नियमनासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. हे अभियान जरी महिनाभर असले तरी वर्षभर सुरक्षित प्रवासासाठी शासन व नागरिकांनी संयुक्त प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले

प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी सांगितले की, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2026 मध्ये धुळे जिल्ह्यात 1 जानेवारी ते 31 जानेवारी,2026 असे महिनाभर हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानादरम्यान हेल्मेट रॅली, शाळा व महाविद्यालयांत जनजागृती रॅली, ‘नो हॉर्न’ जनजागृती, शाळा महाविद्यालयात व्याख्यानाचे आयेाजन, पादचारी नागरिकांमध्ये जनजागृती उपक्रम, आरोग्य विभागाच्या सहकार्याने अवयवदान व रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच बैलगाडी व ट्रॅक्टरवर रिफ्लेक्टर बसविणे, अपघातप्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण, नेत्रतपासणी शिबिरे व चष्मेवाटप करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येईल.

अधिक्षक अभियंता अनिल पवार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच विना-अपघात सेवा दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील वाहनचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रस्ता सुरक्षेबाबत सामूहिक शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम बेडसे यांनी केले, तर गायत्री पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व पदाधिकारी, पीयूसी केंद्र चालक, वाहन वितरक, वाहनचालक व वाहनमालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment

Thanks
https://www.linkedin.com/in/tarun-tadafdar-news-002b4a1a5
https://taruntadafdarnews.wordpress.com/ https://mobile.twitter.com/TARUNTADAFDAR8 https://www.youtube.com/c/TARUNTADAFDARNEWS